Saturday 2 April 2016

बकासुराची आराधना

शालेय जीवनात मी सातत्याने ९०% गुण घरी घेऊन येत असे. पुढे आमच्या मुलाने तीच प्रथा पाळली. त्यानंतर आमच्या कन्यारत्नाने शालेय जीवनात पदार्पण केले. काही काळातच उघड झाले की "नव्वदकरां"च्यात एक "पंचावन्नकर" सामील झाले आहेत.

पाठांतर न करणे, घाणेरडे अक्षर काढणे, अजिबात अभ्यासाला न बसणे, गृहपाठ करायला विसरणे (बऱ्याचवेळा हेतुपुरस्सर), शाळेसाठी वेळेवर न उठणे, परीक्षेबद्दल बेफिकिरी असे typical प्रतिनव्वदकर गुण व पंचावन्नकर लक्षणे नित्याने समोर येऊ लागली. आता आमच्या घरात दोन परिवार नांदतात - नव्वदकर आणि पंचावन्नकर.

गेली तीन वर्षे मी आमच्या पंचावन्नकरांचा "अभ्यास घेण्या"बाबतीत अनेक सत्याचे प्रयोग केले आहेत. ह्यातून एका ठाम निष्कर्षास पोचलो - आपली शालेय व परीक्षा पद्धती म्हणजे एक हिंस्त्र बकासुर आहे. ह्या बकासुराला एकच खाद्य चालते - Marks उर्फ गुण उर्फ percentage उर्फ टक्केवारी. इथे एक नमूद करावेसे वाटते की SSC, ICSE, CBSE तीनही अभ्यासक्रमांची ही गत आहे - काही ICSE/CBSE  पालकांचा असा गोड गैरसमज असतो की ह्या शालेय पद्धती म्हणजे बकासुर नसून Mother Teresa आहेत (खरंतर मी साने गुरुजी म्हणणार होतो पण त्याने ICSE पालकांना मेल्याहुनही मेल्यासारखे वाटले असते). हा धादान्त भाबडेपणा असून उलट ह्या बाकासुरांचे जबडे अधिक रुंद आहेत, त्यांचे दात अधिक तीक्ष्ण आहेत आणि त्यांना SSCच्या बकासुराच्या तिप्पट खाईखाई सुटलेली आहे. असो.

गेल्या वर्षी मी आमच्या मुलाला घेऊन TIFR मधील एका विख्यात शास्त्रज्ञांना "मार्गदर्शना"साठी भेटायला गेलो. त्यांना भारत सरकारने शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान केला आहे. हा पुरस्कार म्हणजे भारताचे नोबेल पारितोषिक असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  म्हणजे लक्षात घ्या की माझी त्यांच्याशी ओळख नाही.  कोणीतरी त्यांचा नंबर दिला, मी फोन केला, ते म्हणाले या,आम्ही गेलो, ते भेटले, गप्पा झाल्या - that easy!

गप्पांच्या ओघात शास्त्रज्ञसाहेब  म्हणाले, "Schools and colleges want marks from you.  So you should study enough to get marks and then tell them - Look, I have given you marks, now please leave me alone".  प्रचलीत शाळा आणि महाविद्यालय पद्धतीच्या बकासुराच्या इतक्या सुसंकृतपणे थोबाडीत त्यांनी लगावली असे अतीव दुःखाने म्हणावे लागते.  ह्याच बकासुराला मी आणि माझा मुलगा नियमीतपणे खाऊ घालत आलोत.  आमच्यामुळे व आमच्यासारख्यांनी त्याला माजवून ठेवले आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते. 

थोडक्यात विद्यमान शाळा आणि महाविद्यालये ही विद्यादान तर सोडाच, कुठल्याच प्रकारचे दान करत नसून निव्वळ मार्कांची वसुली करत आहेत असा उघड अर्थ निघतो.  ह्या गुणदानाच्या  कार्यात निपुण असलेल्या आम्हा नव्वदकरांचे तसेही "भले" होत असते.  परंतु त्याचसोबत ह्या बकासुराला मार्कांची आहुती देताना ज्यांचा हात आखडत असतो त्या पंचावन्नकर विद्यार्थ्यांचे कौतुक करायलाही हरकत नाही.  आजची जीवघेणी शिक्षण पद्धती जर बदलणार असेल तर त्या बदलाचे catalyst हे पंचावन्नकर असतील.  नव्वदकर मात्र नकळतपणे त्या बदलाचा विरोध करत असतात.

आता माझ्या सत्याच्या प्रयोगांकडे वळतो...

2+3 = 5.  10-3=7.  इथवर ठीक आहे.  सर्वसाधारण पंचावन्नकर इथवर सहज पोचतो. का?  तर "माझ्याकडे २ chocolate होती आईने अजून ३ दिली" - खरी chocolate देऊन समजावता येते.  पुढे 24 + 78 आले की थोडा घाम फुटतो पण मारून मुटकून वेळ मारून नेता येते.  पण त्यानंतर 6 - 12 = minus 6 चे काय?  तेव्हा इथे थोडा विचार करून "loan" ही कल्पना आमच्या पंचावन्नकरांना समजावली.  "Negative number म्हणजे खिशाला पडलेले भोक, त्यात chocolate टाकले की भोक बुजते पण chocolate गायब होते, मात्र आता next मिळेल ते chocolate खिशात सुरक्षित राहील" इथपासून ते chocolate चे आपल्यावर कर्ज असणे, कर्ज असल्यास chocolate ची आवक झाल्यावर काय होते इत्यादी इत्यादी करून पंचावन्नकरांना 23 - 100 = Minus 77 हे गणित जमू लागले.  आता 17a - 14b - 8a + 3b करताना आठवण करून द्यावी लागते - "नीट बघ, story काय आहे?".  मग पंचावन्नकर म्हणतात "OK ok आपल्याला already 14 chocolates द्यायची होती पण आपल्याला 3 chocolate मिळाले त्यामुळे आता ... (अं अं ... rough work ... हंssss ... Minus 11!).  गम्मत अशी आहे की पंचावन्नकरांना गणिते जमतात परंतु प्रत्येक गणितामागे तीन ते चार stories असतात, त्या स्वतःला सांगत गणिते करायची तर परीक्षेचा वेळ अपुरा पडतो.  नव्वदकर मात्र धडाधड method वापरून गणितांचा मसाला कुटून चविष्ठ स्वयंपाक करत असतात आणि बकासुराला खाऊ घालत असतात.  त्यांच्यापैकी (आमच्यापैकी) बहुतेकांना ह्या numbers च्या मागे एक theory आहे, त्याला Number Theory म्हणतात आणि त्यावर आपले ब्रम्हांड रचले आहे ह्याचा गंधही नसतो.  तो गंध पंचावन्नकरालाही नसतो.  मग प्रश्न पडतो की नव्वदकर आणि पंचावन्नकर ह्यांच्यात अधिक सुशिक्षीत कोण? का दोघेही तितकेच अशिक्षित?

SSC इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात एक धडा आहे - Ancient KIngdoms of the North.  त्यातील काही शब्द आणि वाक्प्रचार पुढीलप्रमाणे आहेत - Brihadratha, assimilated, flourished, Samudragupta, neighbouring, inscription, Harshavardhan, munificence.  ज्या IT कंपनीत मी नोकरी करतो तिथले पन्नास टक्के कर्मचारी ह्या spelling परीक्षेत पंचावन्नकर ठरतील.  म्हणजे तत्वतः पंचावन्नकर कदाचित IT engineer बनू शकतो पण त्यास बकासुर आडवा येतो.  Brihadratha आणि Harshavardhan - आमचे पंचावन्नकर काहीकेल्या "Brihadratha" लक्षात ठेवू शकत नाहीत परंतु "Harshavardhan" - no problem!  असे का?  तर हर्षवर्धन नावाचा एक अतिशय गोड पण भयंकर वात्रट पोरगा तिचा societyत मित्र आहे.  आता जिथे आपणच "अनुष्का, तनिष्का, राहुल, सोहम शायना" अशी "गोंडस" नावे आपल्या मुलांना देतो तिथे ही जुनी अवजड नावे लक्षात ठेवायची अपेक्षा का करतो?  बरे, अपेक्षा ठेवा - शेवटी तो आपला इतिहास आहे.  परंतु "अशी नावे लक्षात न ठेवणाऱ्या विद्यार्थ्याला डॉक्टरकी करू देणार नाही" हा मूर्खपणा कशासाठी?  ते मूल इतिहास संशोधक होण्याचा तसाही प्रयत्न करणार नाही!

"Dhanananda was a greedy and oppressive king" अशी व इतर अनेक वाक्ये पाठ कर आणि पेपरात लिही असे पंचावन्नकरास सांगणे म्हणजे माझ्यासारख्याला "सलमान खानच्या अमुक चित्रपटातील तमुक danceच्या steps शीक आणि पुढील सहनिवासाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात स्टेजवर करून दाखव" असे म्हणण्यासारखे आहे.  म्हणून आता मी मुलीला सरळ सांगतो की परीक्षेत लिही "Dhanananda was a bad king.  He troubled his people." आणि घे मिळतील तितके मार्क आणि घाल बकासुराच्या नरड्यात.  खरंतर मी तिला Samudragupta ऐवेजी "Sea-secret" लिहायला सांगणार होतो, पण एवढी बंडखोरी लहान मुलावर लादणे बरे नाही म्हणून थांबलो.

बकासुराचे अनेक agent आहेत परंतु ह्या agent समाजातील सर्वात सक्रीय आणि हेकेखोर गट म्हणजे पालक (आणि त्यातही आयांचेspecialization अतिशय उच्च दर्जाचे आहे).  मी एकदा मुलीच्या शाळेत परीक्षेचे पेपर पाहण्याच्या कार्यक्रमाला दबकत गेलो होतो. शेवटी ठरवलं काही नाही मनातले सरळ class teacherना सांगायचे.  माझी पाळी आली तेव्हा त्यांच्या समोर जाऊन बसलो आणि त्यांनी पंचावन्नकरांची तक्रार करण्यापूर्वी मीच म्हणालो "आम्हाला माहित आहे आमची मुलगी अभ्यास करत नाही तिला ५०% टक्के मिळतात.  We are fine with that. तुम्ही उगीच वाईट वाटून घेऊ नका आणि tension घेऊ नका" - हुश्श!!! सागून टाकले एकदाचे!  बाईंचा चेहरा क्षणभर "हा कोण वेडा आला स्वतःला पालक म्हणवत" असा काहीसा झाला.  कारण त्याआधी त्यांच्या समोर बसलेली एक आई म्हणजे "मुलाचे मार्क वाढवायला काय करू" ह्या चर्चेत केवळ "Brain surgery चांगली कुठे होते - जास्लोकला का हिंदुजाला" असे विचारायची बाकी होती.  पण बाई लगेच सावरल्या आणि हसून OK ok as she grows older she will study असा दिलासा त्यांनी दिला.इथे एक गोष्टं नमूद केली पाहिजे की मुलाच्या आणि मुलीच्या शाळेत असे अनेक शिक्षक भटले ज्यांच्या डोळ्यात असा भाव दिसतो की "अरे कशाला उरावर बसता पोरांच्या, मजेत वाढू दे की त्यांना!' परंतु त्यांना पालकांची भीती वाटते. कारण त्यांनी असे म्हटल्यास अनेक पालक "Management"ला जाऊन खडसावतील की "पुढील आयुष्यात आर्थिक यश guarantee करण्याचे steroids मारायला तुमच्या clinic मध्ये आम्ही मुले पाठवतो आणि तुम्ही हे homeopathy/आयुर्वेदाचे तोतये डॉक्टर शिक्षक म्हणून बसवता? तक्रार करू का शिक्षण खात्याकडे?"

SSC इयत्ता सहावी Scienceमध्ये MOTION हा धडा आहे.  त्यात Random motion, Periodic motion, Circular motion, Oscillatory motion यांच्या व्याख्या पाठ करणे क्रमप्राप्त ठरते नाहीतर "बकासुर food" मिळत नाही.  थेट Three Idiots चित्रपटाची आठवण होते.  एक तर Circular is also Periodic or Oscillatory is also Periodic हे पुस्तक तरी सांगत नाही.  घरी मी धावून, चालून, अंगविक्षेप करून दाखवल्यावर पंचावन्नकरांना अभ्यासात इंटरेस्ट वाटला.  त्यांनीही सगळे motions करून दाखवले.  काही तरी उपयोग झाला असेल नाही?  चंद्र पृथ्वीभोवती का फिरतो? - हे एक दोरखंड घेऊन सहज घरात समजावता येते. पण हे व्याप करायला ना  शिक्षकास वेळ मिळतो ना पालकांना.  ह्याच धड्यात "Speed" या कल्पेनेचे introduction आहे.  पण भर कशावर तर Speedचे definition पाठ करण्यावर ... SPEED IS THE DISTANCE TRAVELLED IN UNIT TIME.  किती अगम्य भाषा आहे ही सहावीतल्या पंचावन्नकरासाठी!  हेच जेव्हा मी तिला खाली घेऊन गेलो आणि buildingला आलटून पालटून आम्ही दोघांनी चालत धावत round मारल्या आणि mobileवर वेळ मोजून वहीत तख्ता बनवला तेव्हा कुठे Distance travelled in 1 minute, Distance travelled in 1 second, Distance travelled in 1 hour ह्या संकल्पनांना हात घातला गेला. त्याच वेळी कुठल्या तरी घरात एखादा नव्वदकर असल्या दहा व्याख्या पाठ करून दहा मार्क खिशात घालत होता.  घालो बापडा - त्यात काही गैर नाही.  आणि पाठांतर व संस्मरण यांना निश्चित किंमत आहे. परंतु ह्या सगळ्या प्रकारात चाचणीचा एकच निकष (बकासुराचे समाधान) असल्यामुळे पाठन्तारातील पंचावन्नकरावर "सरसकट पंचावन्नकर" असा ठपका लागतो.  ह्यातून मार्ग काय? सरळ सरळ मुलांना सांगायचे - लिही ... Speed means running fast or slow.  If I run faster than Anushka I have more speed.  But she always has more speed.  Next time I will have more speed than her.  तसेही शिक्षकाला तपासणी साठी वेळ असतो किती?  Engineeringला माझा एक मित्र होता.  तो सांगायचा की एका third semesterच्या पेपरला त्याने अजिबात अभ्यास केला नव्हता आणि म्हणे सगळे प्रश्न तीनदा उतरवून काढले (त्याचे हस्ताक्षर अप्रतीम होते) तर म्हणे PASS झाला !!!  खरं खोटं माहित नाही but I would not be surprised if it is true.

परीक्षेच्या सीझन मध्ये सकाळी पत्नीसोबत चहा घेत असलो की तिच्या Whatsapp ग्रुपवर आयांचे धडाधड मेसेज येतात - "Aga konala yacha answer mahit ahe ka - GIVE REASONS: Population density in South Asia is very high".  ही आज सकाळची ताजी कथा आहे.  आत आमची मुलगी परीक्षेला जाण्यासाठी तयार होताहोता तिच्या पाळीव मांजरीशी खेळत होती. मी स्वतःशी हसलो आणि म्हणालो - "चालले आमचे पंचावन्नकर वीर ... बकासुर अराधकांच्या बालयोध्यांशी compete करायला!.  भीम तिचे बापडीचे रक्षण करो!"

- एक पंचावन्नकर बाप, पूर्वाश्रमीचा बकासुर आराधक नव्वदकर विद्यार्थी.




4 comments:

  1. Well written Amlesh.I have come to the conclusion that 10th N 12th marks are no measures for a child's capability. In the near future atleast there is no other way but to follow it.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. One thing is certain that out of 50 students in a class not all kids can be grade I students, some have to be II or III. some kids may not like learning and writing till a certain age. some enjoy scribbling some enjoy being neat and clean about writing. Some like animals but hate insects while others who can kill insects in the wink of an eye cannot tolerate cats and dogs.

    The main problem with our education system is lack of subjects.
    There should be a variety of subjects for children to choose from in the primary and middle section. They can be combined together as the child goes to the middle level. Till then every month or 2 - 3 months let children experiment with the subjects of their choice.
    Make categories or groups bunching a few subjects together and let the child select something of his or her choice, till they come to an understanding age of compulsory and optional subjects.
    why should Art subjects like painting music dance craft acting gardening carpentry plumbing car mechanics cooking embroidery be hobby subjects. Get these subjects in the main stream. Add some science, some interesting facts some mathematics in these subjects and let children present them to the teachers in their own capacity.
    Let the child develop its own inquisitive skills...

    ReplyDelete