Wednesday 16 June 2021

गणतंत्रवाद आणि राष्ट्रवाद

गेल्या दशकात जगभर आणि विशेषतः भारतात "राष्ट्रवाद" (nationalism) हा परवलीचा शब्द झाला आहे. राष्ट्रवादी (nationalistic) नसणे किंवा स्वतःच्या राष्ट्रवादाचे उघड प्रदर्शन न करणे हा जणू काही गुन्हा असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर "राष्ट्रवाद" (nationalism) म्हणजे नक्की काय यावर विचार करणे गरजेचे ठरते. वारंवार मोठ्याने आणि सार्वजनिक स्तरावर "भारत माता की जय" ओरडणे, राष्ट्रगीत वाजल्यास उभे रहाणे, राष्ट्रध्वज फडकवणे ही प्रखर राष्ट्रवादाची लक्षणे मानली जातात. आणि अशा राष्ट्रवादाच्या ज्वराच्या प्रदर्शनाचे फायदे हे राजकारणी आणि सन्मानीत मंडळी यांना नियमीतपणे मिळत असतात. त्याबद्दल आपल्याला पोटदुखी व्हायचे कारण नाही.  इतरांचे नुकसान न करता एखाद्याचे भले होत असल्यास आपल्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही. परंतु निदान "आपली दिशाभूल तर होत नाही ना?" एवढी काळजी घ्यायला हवी.

Nationalism म्हणजे नक्की काय हे समजून घ्यायचे असेल तर अगोदर "nation" या शब्दाचा अर्थ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शब्दाची व्युत्पत्ती (etymology) समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवा. "Etymology" म्हणजे शब्दाचा उगम व त्याचा ऐतिहासिक विकास. शब्दाचे मूळ काय आहे व आज त्याचा सर्वमान्य अर्थ काय आहेत्याचा एकच सर्वमान्य अर्थ आहे काया प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे ठरते.

Nation या शब्दाचे मूळ "natio" म्हणजे "जन्म" या Latin शब्दात आहे (https://en.wikipedia.org/wiki/Nation). परंतु प्रचलित वापराच्या दृष्टीने पाहिले तर कालांतराने या शब्दाच्या अर्थास अनेक फाटे फुटले आहेत. Googleमध्ये "meaning of nation" असे शोधल्यास या फाट्यांचे दर्शन घडते.

माझ्या राज्यशास्त्राच्या अल्प समजुतीत परवलीचा शब्द "राष्ट्र" (nation) नसून तो गणतंत्र (republic) आहे हे आधीच सांगून मोकळा होतो.

१९४२ साली बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती महासंघाची (Scheduled Caste Federation) स्थापना केली.  पुढे १९५६ साली या महासंघाचे निराकरण करून त्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाची (Republican Party Of India - RPI) स्थापना केली. विकिपीडियावर आपण जर RPIचे संकेतस्थळ अभ्यासले तर पक्षाची विचारसरणी (ideology) या सदरात खालील शब्द आढळतात - घटनावाद (Constitutionalism), गणतंत्रवाद (Republicanism), आंबेडकरवाद (Ambedkarism), प्रगतिवाद (Progressivism), सेक्युलॅरिझम (Securalism), समतावाद (Egalitarianism).

("Secularism" या शब्दाचा मराठी अनुवाद वापरायचे मी टाळले आहे याचे कारण खुद्द नरहर कुरुंदकरांनी आपल्या "सेक्युलॅरिझम आणि इस्लाम" या निबंधात असा आग्रह मांडला आहे.)

रिपब्लिकन पक्षाच्या नावातच "गणतंत्रवादी" ह्या शब्दाचा समावेश आहे, बाबासाहेबांनी "राष्ट्रवादी" हा शब्द वापरला नाही हा निव्वळ योगायोग आहे हे मानायला मी अजिबात तयार नाही. भारताची घटना आपल्या हातून लिहिली जावी हा काही बाबासाहेबांचा शौक किंवा स्वप्न नव्हते. "ज्याचे जळते त्याला कळते" हे साधे व अपरिवर्तनीय सत्य तर त्यामागे असावेच, पण त्याहीपेक्षा, चाळीस कोटी जनता, त्यात अनेक धर्म, भाषा आणि विध्वंसक जातीवाद यांना ध्यानी ठेऊन अधुनिक गणतंत्राचा यशस्वी पाया ठरेल असे संविधान घडवण्याचे जोखमीचे कार्य आपण पार पाडू शकतो असा त्यांना आत्मविश्वास होता, तेवढी त्यांची क्षमता व विद्वत्ता होती आणि याची जागरूकता आपल्या सर्वपक्षीय राजकीय नेतृत्वाला होती.

तेव्हा "राष्ट्रवाद", "nationalism" च्या कोलाहलास समर्पक उत्तर म्हणजे "I believe you might be confusing republicanism with nationalism" म्हणजेच, "मला वाटते आपण गणतंत्रवादा ऐवजी चुकून राष्ट्रवाद म्हणत आहात" हे आहे. राष्ट्रवादाचा ज्वर चढलेली सामान्य जनता याचा फारसा विरोध करणार नाही. उलट दुर्लक्ष करतील आणि फार तर फार "तेच ते, उगाच कीस कशाला काढता?" असे म्हणून पुढे जातील. परंतु देशात हाताच्या बोटांवर मोजता येतील अशी धूर्त राष्ट्रवादी नेते मंडळी आहेत ज्यांना "राष्ट्रवाद" आणि "घटनावाद"/"गणतंत्रवाद" यातील भेद नेमका समजतो. किंबहुना, हा भेद आपल्या श्रद्धास्थानांना १९४७-१९५० या काळात एक तर समजला नाही किंवा "घटनाधीश" संविधान घडवत असताना त्यांना सामोरे जायची किंवा त्यांचा विरोध करायची बौद्धिक क्षमता त्यांच्यात नव्हती याची निराशा त्यांच्या मनात आहे. त्यातच आजच्या "राष्ट्रवादाच्या आक्रोशाची मुळे आहेत. जे कार्य आपली श्रद्धास्थाने करू शकली नाहीत, ज्या कार्याची त्यांना साधी जाणीवसुद्धा होऊ शकली नाही ते कार्य सिद्धीस नेण्याचा पराकोटीचा प्रयत्न गेली तीन दशके ते करीत आहेत आणि त्यांना त्यात प्रचंड यश लाभल्याचे आज आपल्याला दिसत आहे.

भारतीय स्वत्वाचे अचूक रेखाटन साधायचे असल्यास आपल्या समोर आज दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे घटनावाद/गणतंत्रवाद. खरं पाहाता हा पर्याय १९५० साली आपण स्वीकारला आहे. त्यामुळे पुनःश्च चर्चा करण्याचे तार्किक कारण अस्तित्वात नाही. परंतु आज राष्ट्रवादाचा धोकादायक ज्वर हा कृत्रिम आणि हेतुपुरस्सर पद्धतीने इतक्या विकोपास नेण्यात आला आहे आणि सामान्य जनतेने स्वेच्छेने त्या ज्वराचा इतका तीव्र संसर्ग स्वतःवर ओढावून घेतला आहे की नाईलाजाने चर्चा करणे भाग आहे. निदान आजच्या वातावरणात ह्या दुसऱ्या पर्यायाची चर्चा संभवते एवढे तरी सर्वांनी मान्य करावे.

माझे स्वतःचे मत असे आहे की गणतंत्रवाद हा अचूक, निःसंदिग्ध आणि खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आहे; राष्ट्रवादास माझा प्रखर विरोध नाही, परंतु राष्ट्रवाद निःसंदिग्ध असू शकत नाही. राष्ट्रवादास आलिंगन देण्यात काहीच गैर नाही परंतु राष्ट्रवादाचा गैरवापर करून समाज विभाजित करू इच्छिणारे अस्तित्वात आहेत आणि "राष्ट्रवादाचे अनेक प्रचलित अर्थ आणि व्याख्या अशा कुकर्मास अनुकूल ठरतात. "राष्ट्र"/"nation"च्या व्याख्येचे अनेक अवतार आहेत. त्या अवताराचा सारांश विकिपीडिया मानून तेथील व्याख्येकडे आपले लक्ष वेधतो:

 "A nation is a community of people formed on the basis of a common language, history, ethnicity, a common culture and, in many cases, a shared territory".

"समान भाषा, इतिहास, वांशिकता, संस्कृती आणि बऱ्याचदा सामायिक भूभाग यांवर आधारित माणसांचा समुदाय म्हणजे राष्ट्र".

ही व्याख्या गोंडस वाटते. शाळा-कॉलेजच्या परीक्षेत अशीच्या अशी लिहिली तर चांगले मार्क पडतील ही खात्री. पण ह्यातील निकष जर भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशास लावले तर संविधानाभोवती धूम्रपटल उभा राहतो आणि "बोलायचे एक आणि करायचे दुसरेच" हा वैचारिक बेबनाव पदरी पडतो.

घटनेचे आणि गणतंत्राचे एवढे स्तुतिपठण केल्यावर मी पुनः एकदा संविधानाची प्रत चाळली. तर तिथेसुद्धा माझ्या दृष्टीने आक्षेपार्ह असा काही मजकूर सापडला. माझ्या उपरोक्त युक्तिवादाशी जर मला एकनिष्ठ राहायचे असेल तर खालील बाबी नमूद केल्याशिवाय राहवत नाही. संविधानात अनेक वेळा "nation" हा शब्द आढळतो, उदाहरणार्थ - "national life", "national importance", "just and honourable relations between nations", "National Flag", "National Anthem" इत्यादी. आजच्या वातावरणात मला हे संदर्भ खटकतात.  संविधानात "Republic" हा शब्दसुद्धा आढळतो, परंतु "nation" या शब्दाएवढा वारंवार नाही!

आता समकालीन जागतिक राष्ट्रवादावर एक ओझरती नजर टाकूया. आज जगातील नामांकित राष्ट्रवाद्यांमध्ये स्टीव्ह बॅनन यांचा उग्र राष्ट्रवाद उठून दिसतो. बॅनन यांच्या विचारांशी परिचित झाल्यावर, आजच्या जगातल्या "राष्ट्रवाद" या शब्दाच्या वापरावर संशय घेणे मला भाग पडते.  भारतात बॅनन यांचे नामवंत चाहते आहेत. केवळ भीतीपोटी त्यांचे नाव घेणे येथे टाळले आहे.

मी स्वतःला कितीही घटनावादी/गणतंत्रवादी म्हटले आणि "संविधानिक गणतंत्रासारखी निखळ बांधणी उपलब्ध असताना राष्ट्रवादाचा फाटा नको" असा आग्रह धरला तरी माझे अनेक मित्र, परिजन, नातेवाईक आहेत ज्यांना ते पुरेसं पटणार नाही; राष्ट्रवादाचा धूम्रपटल दूर लोटण्यास त्यांचे मन कचरेल. त्यांना माझी विनंती आहे की तुमचा बेबनाव सोडा (तो अनैच्छिक असला तरी). घटनादुरुस्तीचा हक्क आपल्याला घतनेनेच प्रदान केला आहे. उघडपणे राज्यकर्त्यांना सांगा की "We the people" ("आम्ही लोक") यात काही राम नाही, त्याचे विस्तृतीकरण गरजेचे आहे आणि त्याप्रमाणे "We the Maharashtrians", "We the Hindus" इत्यादी विभाग/उपविभाग ध्यानात ठेवून घटनेत योग्य त्या दुरुस्त्या करा. अर्थात, आपणास हवी तशी घटना लिहिणाऱ्या विद्वानांचा शोध त्वरित आरंभा!