Thursday 4 February 2016

मृत्यु



मृत्यु

मृत्यु म्हणजे दु:खं, मृत्यु म्हणजे शोक, मृत्यु म्हणजे अवकळा, संकट, tragedy ... अशी सामाजिक विचारसरणी आहे. परंतु जिथे "आयुष्याचा अर्थ काय?" या प्रश्नाच्या उत्तराची नेमकी उकल झालेली नाही तिथे असा प्रश्न पडतो की "निरर्थक किंवा ज्याचा अर्थ, उपयोग, ज्याचे प्रयोजन ठाऊक नाही त्याच्या अंताचे दु:ख आपल्याला का होते?"

अल्पवयाच्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यास दु:खासोबत हळहळ वाटते. ह्याचे तर्कशुद्ध विश्र्लेशण करुया. मानवी आयुष्याचा पाया हा उमेद, आशा, जिद्द, कर्तबगारी, "यश" याचा असतो. अल्पवयीन मृत्युने ह्यांचा विध्वंस होतो त्यामुळे विनाशाची हळहळ भासत असावी. त्यातूनच "अरेरे संपूर्ण आयुष्य समोर उभं होतं", "भरल्या ताटा वरून उठून जाणे", "आत्ता कुठे त्याला लय सापडली होती, पाच वर्षात कुठल्याकुठे गेला असता" अशा भावना प्रकट होत असाव्यात.

परंतु साधारणपणे वय वर्ष साठ नंतर या भावनांना फारसा वाव उरलेला नसतो.  आयुष्याचा उमेदीचा आणि खटपटीचा काळ लोटलेला असतो. परंतु तरीही दु:ख प्रकट केले जाते. तेही स्वाभाविक आहे असे म्हणायला हरकत नाही.

परंतु आपले आयुष्य यशस्वीरित्या (निदान सामाजिक संकेतांनुसार) पार पाडलेल्या वृद्ध व्यक्तीच्या देहांताने आपल्याला अजिबात आनंद होऊ नये?

याबाबतीत माझ्या आईच्या मृत्युने मी कसा संतुष्ट झालो ते पाहूया. तिने आयुष्यात अनेक तीव्र उतारचढा पाहिले, शेवटच्या दहा वर्षात शारिरीक स्वास्थ्याचे त्रास सोसले. 2006 साली तिला  ह्रदयविकाराचा झटका आला तेव्हा आयुष्यातील अनेक उतारचढावातील अतिशय आनंददायी चढाव in progress होता. त्यामुळे hospital मध्ये नेतानाच मी स्वतःशी म्हटले की आता हिच्या आयुष्याचा अंत झाला तर उत्तम.  HOSPITAL मध्ये डॉक्टरना मी बजावले – कुठलेही धाडस दाखवू नये, शस्त्रक्रिया सुचबू नये, परवानगी मिळणार नाही, हवे तर लिहून देतो संपूर्ण जबाबदारी माझी, घरी नेण्या इतपत औषधोपचार करा.  दहा दिवसात तिला घरी आणले. एका आठवड्याने पुनः heart attack आला. तेव्हा family doctor बाईंशी मोकळेपणे बोललो. त्यासुद्धा अनुभवी, व्यावहारिक आणि आम्हाला ४५ वर्षे ओळखत असल्याने परिस्थिती जाणत होत्या. “आणखी एक आठवडा” असे भाकीत त्यांनी सांगितले आणि तसेच घडले. शेवटचे दहा दिवस ती कोणालाही ओळखायची नाही. तेव्हा मी माझ्या एका मित्राला विचारले की हा काय प्रकार सुरु आहे उमजत नाही (बिकट प्रसंगी या माणसाने अनेक वेळा अचूक सल्ला दिला आहे).  तो म्हणाला “Just sit next to her every day.  Even if she seems not to understand, talk to her.  She will let you know in her way whether she wants to continue or not.  Take your decisions based on that.  Nobody else can tell you what is right and wrong.”  अंततः मी प्रसन्न मनाने आईला अग्नी दिला.

माझ्या वडिलांचा म्रुत्यु मात्र अकाली झाला. उत्तुंग यशाच्या शिखराकडे वाटचाल करत असताना. त्यामुळे आधी म्हटल्याप्रमाणे अतीव दुःखास पात्र अशी घटना होती. परंतु त्याबाबतीत देखील आयुष्यभर विचित्र अनुभव आले. अनेक वेळा आयुष्यात असे प्रसंग आले (विशेषतः परदेशी) जेव्हा सोबतच्या व्यक्तीबद्दल मला वाटे की “ही व्यक्ती इतकी कशी व्यवहारशून्य, परिस्थितीचे राजकारण अजिबात कसे समझत नाही, इत्यादी.”  त्यातल्या काही cases मध्ये लक्षात आले की ह्या मुलाचे (बाप्याचे) वडील अद्याप हयात आहेत, धडधाकट आहेत – आणि कदाचित त्यामुळे ह्यातले पोर अजून पुरुषावर भारी आहे. माझी अशी धारणा आहे की निदान भारतीय संस्कृतीत तरी boyhood ते manhood हे परिवर्तन वडिलांचा देहांत झाल्याशिवाय पुरते पार पडत नाही.

आईच्या संबंधात अलिकडेच एक विलक्षण अनुभव आला.  ती ज्या शाळेत शिकवायची त्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या शिक्षकांचा सत्कार सोहळा आयोजित केला. मला बोलावले होते. कुतूहलाने गेलो कारण त्या काळच्या ओळखीच्या शिक्षकांना भेटावेसे वाटले. शाळेतील  इनामदार सर नावाचे शिक्षक भेटले. मी त्यांना नमस्कार केला आणि ओळख दिली. त्यांना प्रचंड आनंद झाला. माझा हात धरून ते शेजारी उभ्या असलेल्या विद्यार्थ्याला म्हणाले, “ह्या चिरंजीवांच्या आईने मला घडवले. पंचवीस वर्षांचा होतो शाळेत आलो तेव्हा. चारचौघात कसे बसावे कसे बोलावे वर्ग कसा सांभाळावा हे सगळं बाईंनी शिकवलं मला आणि परबला.” आता पाहा, आई हयात असताना मला हे कोणी म्हणाले नाही. ती गेल्यावर ऐकायला मिळाले.  आणि हे ऐकल्यावर वाटले की “मृत्यु” आणि “अंत” ह्यात काहीच संबंध नाही. आईचा मृत्यु झाला पण अंत नाही झाला. असे अनेक लोक असतील नाही जे “हयात” आहेत पण एकतर अंत पावलेत अथवा “सुरु” झालेच नाहीत.

माझ्या पणजोबांचे वडील (आईकडून) मृत्य पावून दीडशे वर्षे झाली असावीत. त्यांची गोष्ट अलिकडे मामे भावाने सांगितले. ते व्यापारी होते. त्यांची दोन गलबते होती.  मुंबई आणि आखाती  देश यांच्या दरम्यान त्यांचा व्यापार चाले.  एका वादळात दोन्ही गलबते बुडाली आणि त्यान्वये त्यांच्या व्यापाराची तीच गत झाली.  तेव्हा त्यांनी आपली स्थावरजंगम मालमत्ता विकून देनेकार्यांचे पैसे फेडले आणि शिल्लक पुंजी आपल्या चार मुलांच्यात वाटली.  प्रत्येक मुलाच्या वाट्याला त्याकाळी (एकोणिसावे शतक) म्हणे दहा हजार रुपये आले (नंतर पैसे कुठे गेले हा इतिहास वेगळा आहे – आमच्यापर्यंत पोचले नाहीत!).  ही कथा ऐकून मी अवाक झालो. माझा मामे भाऊ माझ्यासाठी कर्तबगारीची परिसीमा आहे.  परिवाराचा इतिहास त्याला A to Z माहिती आहे.  आणि माझ्या लक्षात आले की आमचे ते धाडसी पूर्वज त्याचे प्रेरणास्थान आहेत.  दीडशे वर्षांनंतर प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीस “मृत” असे संबोधणे “जीवावर” येते!

पुनः ह्या प्रश्नाकडे वळतो - आपले आयुष्य यशस्वीरित्या (निदान सामाजिक संकेतांनुसार) पार पाडलेल्या वृद्ध व्यक्तीच्या देहांताने आपल्याला अजिबात आनंद होऊ नये? वार्धक्याच्या हालअपेष्टांतून सुटका, एका संपन्न आयुष्याची सांगता, पुढील पिढीच्या सान्निध्यात व मायेत  मागील पिढीची समाप्ती आणि त्यातून पाळला गेलेला निसर्गक्रम – ह्याचे समाधान वाटणे मला तरी स्वाभाविक वाटते.

मला वाटतं दुःखाचे खरे मूळ हे “एक दिवस आपण मारणार” या जाणीवेत दडलेले असावे.  मृत्यूचे भय मला अनाकलनीय वाटते. शारीरिक हालांच्या विचाराने घाबरणे मी समजू शकतो. पण निव्वळ मृत्यूला घाबरणे विचित्र वाटते. काही मंडळींचा स्वभाव असतो,  party तून मध्येच उठून जाणे त्यांना कष्टाचे वाटते.  आपण गेल्यावर खरी मजा घडेल, आपण गेल्यावर आपल्याबद्दल लोक काही बोलतील का? – अशी काळजी वाटणारी बरीच मंडळी असतात.  मृत्यूचे भय मला यासारखे वाटते.  सगळं जग एका क्षणात एकत्र मरणार असेल तर कदाचित एवढी भीती वाटणार नाही.  अनेक पुरुषांना काळजी असते की माझ्यामागे मुलांचे कसे होईल? बायको एकटी मुलांना कशी वाढवेल? मुळात आपण आदर्श बाप आहोत असा आम्हा पुरुषांचा गैरसमज असतो. आमच्या लक्षात कसे येत नाही की मुले आमच्या वाईट सवयी, आमचा कमकुवतपणा यांचेदेखील ग्रहण करू शकतात. मुलांचे यश तेवढे आपल्यामुळे आणि अपयश हे शाळा, शिक्षक, सरकार, “सांगत”, समाज यांच्यामुळे!

स्त्रियांच्या स्वतःच्या मृत्यूबद्दल काय भावना असतात याबद्दल पुरुषाने बोलणे म्हणजे मृत्यूपेक्षा भयानक संकट स्वतःवर ओढवून घेणे अशा समाजात मी वावरत असल्याने त्या विषयावर मौन पाळणे उचित.

4 comments:

  1. Nice blog. Compels the reader to think.

    ReplyDelete
  2. Nice blog. Compels the reader to think.

    ReplyDelete
  3. Hey Amlesh U have done a great up on "Mrityu" ...Congrats I totally agree with Ur thoughts when U say about a feeling of satisfaction when a senior and very dear person passes away peacefully... I felt the same when mummy and daddy passed away. Active as they were throughout their lives not knowing the meaning of depending on others, it would have been a big blow to their self esteem to live a life dependent on others...
    They did not even like the idea of visitors dropping by to see them in their sick state.
    It is at times when I am at a total loss do I wish they were there to advise and comfort, but then I remember their touch their feel and I know I will pull out of my crisis.
    About being scared of death, I think the reasons could be numerous.... especially after hearing stories about heaven and hell since childhood...
    We do not know what is in store for us out there...??
    Will we be all alone or will we get to meet our lost dear ones???

    I fear the heat of the furnace...and the thought that I may feel it...😔😔😔
    But Ur article Amlesh is not only thought provoking but very inspiring too..👍🏻👍🏻👍🏻

    ReplyDelete
  4. Keep writing Amlesh,nice thoughts,anil

    ReplyDelete